ओल्या मातीला गंध देणारा
तडतड ताशा वाजवत
कडाडत्या विजेलाही संगे घेऊन येणारा
सारवल्या खळ्याचे तलाव करून टाकणारा
आमच्या गावचा पाऊस
झाडाझुडूपांना नाचायला लावणारा
रानफुलांना खदाखदा हसवणारा
आमच्या गावचा पाऊस
कष्टाळू कुळवाड्याला सुखावणारा
पिकांना गोंजारणारा
आमच्या गावचा पाऊस
दारात झिम्मा खेळणारा
पागोळ्यांतून छोट्या बाळूच्या हातात बागडणारा
आमच्या गावचा पाऊस
तिला, त्याला, सा-यांना हवाहवासा
वाटणारा
उत्साह, चैतन्य नि जलवर्षाव
करणारा
आमच्या गावचा पाऊस
मातीच्या घराला झोडप झोडप झोडपणारा
आणि कधी कधी रुसला तर…
आत्महत्या करायला लावणारा

No comments:
Post a Comment