Sunday, 31 August 2014

आनंदाची साठवण

जाता जाता श्रावणसरींनी, 
मागे वळून पाहिले…
कळले नाही त्यांना,
कोण भिजायचे राहिले…

चला! चला! बाहेर पडा!
ओंजळीत भरा शेवटची सर…
साठवण करा ह्रदयात,
सालभरासाठी…

पावसात भिजताना

पावसात भिजताना डोळे भरून आले,
मनीचे सारे दाह शांत झाले
कशा नि कसल्या कडु-गोड आठवणी,
साचून राहिल्या होत्या मनात
पर्जन्यसरींनी सारे दुःख हलके केले.
मनाला उल्हासित केले.
आयुष्यातील पुढील संघर्षाला 
हसत सामोरे जाण्यासाठी



आईऽऽऽऽऽऽ पुन्हा कधी भेटशीलॽ

फक्त सुट्टीत माझी तिच्याशी भेट होते.
किती काळ आपण दूर राहिलो,
कसे सरले दिवस तुझ्याशिवाय
मनाला कशी घातली समजूतॽ
या विचारांची दोघांशीही गट्टी होते.
डोळे पाणावू लागतात.
तिचा प्रेमळ स्पर्श होताच,
सर्व विसरून तिच्या मिठीत सामावून जाते.
वात्सल्याने पुरेपूर सुखावते.

सुट्टीचे दिवस पण कसे पटकन सरतात.
पुन्हा भाळी लिहिलेला विरहाचा क्षण समीप येतो,
आणि भेट होण्याआधी जी अवस्था असते,
तिच पुन्हा होते
आईऽऽऽऽऽऽ पुन्हा कधी भेटशीलॽ 


कधी कधी

कधी कधी वाटते
कविता नसावी
नुसतेच भावनेचे भारलेपण
तर तिने मांडायला हवेत
जळजळीत प्रश्न
तिने थैमान घालावे
विद्रोहाचे...
सगळ्या कविकल्पनांवर
नाहीतर पेटवावी
एक अखंड ज्योत
समाजाच्या हितासाठी...


स्वागत नववर्षाचे

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावरूनी
टाकू पुढे पाऊल
लागली नववर्षाची चाहूल

उगवली मंगलमय ती उषा
सापडली नवी दिशा
जुने सर्व ते घडून गेले
विसरून सारे जाऊ या
नववर्षाची मजा लुटू या

डोळ्यांत असेल खुशी
ओठांवर हास्य
नववर्ष सुखाचे छान

स्वप्नांना करा नयनात जागे
काट्यांच्या वाटेत पसरवा फुले
हे नववर्षच हे नवचैतन्य आपुले

साठवू ह्रदयात आनंदी क्षण
विचार करू चांगल्या गोष्टींचा
चिमुकल्या गोड स्वप्नांचा
नववर्षच हे मोरपिसारा

शुभेच्छा सर्वांना
एका मंगलमय, सुंदर
आनंदमयी खूप छान
एकदम मस्त अनोख्या
झक्कास नववर्षाच्या

चला सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावरूनी
टाकू पुढे पाऊल
लागली नववर्षाची चाहूल

फसवा बहर

मोगरा फुलला, अंगणी गंध दरवळला
सख्याच्या ओढीने, जीव व्याकुळला

परसात लाविली फुलझाडे, परि मोगराच आवडे
नाजुकशी वेल तयाची, श्वेत सुगंधी बहर चढे

सुवासिक कळी मोग-याची, प्रिती उमले मनातली
प्रियाची मज आठवण येता, हसली कळी गालातली

मोग-याची फुले वेचली, अन् हार गुंफिले
सख्या तुझे स्वागत करण्या सज्ज जाहले

ओंजळ भरली फुलांनी, दरवळ वाढतच गेला
कळ्यांनी तुझ्या येण्याचा निरोप मला सांगितला

हा सुगंधी मोगरा वसंत ऋतूत बहरतो
तुझ्या येण्याची चाहूल देतो
आजही मोगरा फुलला आहे
नखशिखांत वेल बहरला आहे
पण फुलांचे फुलणे हे केव्हातरी कोमेजणे
तसे त्याच्या येण्याचे
आणि माझ्या स्वप्नांचेही…


माझे गाव

हिरव्या गर्द वनराईने नटलेले
माझे गाव

जिथे आहेत उंचच उंच डोंगर
आणि शिवबाचा सिद्धगड
याच गडाच्या पायथ्याशी
एका कौलारू इमारतीत
भरते मुलांची शाळा
शाळेमागे खेळांचे मैदान
जसे निसर्गाने दिले आंदण
असे माझे गाव

जिथे राहतात लोक कष्टकरी
शेतात राबून आनंदाने
खातात भाजी-भाकरी
जिथे स्वयंभू रामेश्वराचे स्थान
असे माझे गाव

तिथे छोटीशी नदी
फुलविते शेते सारी
तिथे वर्षातल्या महाशिवरात्री
रामेश्वराचा वार्षिकोत्सव भारी
त्या निमित्ते एकोप्याच्या भावनेने
माणसं बांधली जाती
दुःख सारे विरून जाई
असे माझे गाव

जिथे लोक राहती मजेत
सुख-दुःखे वाटून घेती सर्वांची
जिथे मालवणी, कोकणी, मराठी
संस्कृतीचे दर्शन घडे
असे माझे गाव

आठवणींची फुलं

आठवणींच्या पाकळ्या गळून पडत नाहीत
टवटवीत कळी होऊन मनात फुलत राहतात
त्यांचाच आधार घेऊन पुढे सरकावे तो…
फुले त्यांच्या गंधाने वेडावून टाकतात

काही क्षण पडदा दूर सारला जातो
मन आठवणींच्या जाळ्यात सापडते
भवतालाचा विसर पडतो
प्रितीचे पंख लावून
मन पाखरू उडू लागते
वास्तवाचे भान येताच
मन सावरले जाते

कायमचा पडदा पडत नाही
आठवणींच्या फुलांवर
कळत नाही का?
आठवणी अशा ओढ लावतात…



माझे कोकण

माझे कोकण, माझे कोकण
सृष्टीचे हे नंदनवन
नारळ पोफळीच्या बागा
आंब्या फणसाची झाडे
काजू करवंदाची रेलचेल
उंचच उंच डोंगर – दऱ्या
सागरतीरीचा खारा वारा

तांबड्या मातीत पाण्याचे झरे
गावागावात कौलारू घरे
दिवस कसा पटकन सरे
खळ्यातले चांदणे, देखणे आकाश
कातरवेळेला काजव्यांचा प्रकाश
पावसाच्या धारा, फेसाळत्या लाटा
शुभ्र वाळूचा मोहक किनारा

वर्षाच्या बारा महिने
सण-उत्सवांची धमाल
दशावताराची न्यारी कमाल
पावसाच्या आगमनाने धरती सजे
हिरवीगार शेते फुलती
वा-यासंगे हालती – डुलती
वनराई घेई हिरवी शाल

शिमग्याला शेवया, होळीला पुरणपोळी
शहाळ्याचं पाणी, उकड्या भाताची पेज
कोकम सरबत, मालवणी खाजा
यांची चव एकदम बेस
माश्यांच्या कालवणाचा
आस्वाद रसना तृप्त करतो...

साधी-भोळी कोकणची माणसा
पिकल्या फणसासारखी
काळजात आपुलकी थोडीशी भीती
चाकरमान्यांचे लाड पुरविती
कोकण रेल्वेने येवा म्हणती
कोकणचा मेवा मनात
जपून ठेवा म्हणती… 



Saturday, 30 August 2014

रिश्तों का इंतजार

कुछ रिश्तें ऐसे होते है।
जो कुछ पल के लिए खुशियाँ दे जाते हैं।
वो रिश्ते जिंदगीभर साथ निभाना नही जानते,
पर उस पल को सुनहरा कर जाते है।

ऐसे रिश्तों का कोई वजूद नही होता।
कोई मतलब नही होता।
पर कोई सच्चा दिलवाला,
ऐसे पलभर के रिश्तों को भी,
आपना जीवन मान के बैठता है।
सोचता है की उस पलभर के रिश्तों ने,
कुछ पल जिंदगी के हसीन कर दिए।

अब नए रिश्तें ढूँढूँ,
या इंतजार करू
फिरसे उन पलभर के रिश्तों का
नही…
ऐसे रिश्तों का भला कोई
इंतजार करता है क्या?
ऐसे रिश्ते आसानी से मिल जाते हैं।
अगर इंतजार ही करना है,
तो उन रिश्तों का करो,
जो जिंदगीभर साथ निभाते है,
और साथ निभाना जानते हैं।



माझ्या मनात तुझे येणे जाणे

सायंकाळी आकाशात ढग भरून येणे
भरलेल्या ढगांतून पावसाच्या
रिमझिम सरी बरसणे
कोरड्या धरणी मायेचे तृप्त होणे
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे

वसंत ऋतूच्या आगमानाचे
चराचर सृष्टीने स्वागत करणे
कोमल पल्लवीने
सौम्य फुलसुगंधाने सारे
त्रिभुवन सुवासिक करणे
आणि माझ्या मनात
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे

हिरव्यागार आमराईवर
मोहोराची झालर चढणे
आम्रवृक्षावर बैसोनी
कोकीळेने गाणे म्हणणे
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे

सणांची राणी दिवाळी येणे
लक्षलक्ष दिव्यांनी सारा
आसमंत उजळणे
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे

सरल्या रात्रीनंतर दिवसाचे येणे
चंद्राचे जाणे अन् सूर्याचे येणे
मंगलमयी पहाट होणे
कोंबड्याचे आरवणे
पहाटेची चाहूल देणे
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे

पहाटेच्या वेळी
अंगणात सडा टाकणे
त्यावर फुलकीशी
रांगोळी काढणे
तुळशीला पाणी घालणे
उजाडत्या पा-यात
अंगणात कावळ्याचे ओरडणे
आणि माझ्या मनात तुझे येणे जाणे





जगण्याची रीत

काही झालं
काही बिनसलं
की वाटते सतत एकटेच असतो आपण
पण नाही,
समाज असतोच, अदृश्य वा-यासारखा
सतत आपल्यासोबत

त्याला पहायचे असते,
काय करतोयस तू
कुठे आहेस तू
आणि जाऊन जाऊन कुठे जाशील तू…
येशील नाही यावंच लागेल तुला
पुन्हा समाजाकडे

शेवटी तुलाही वाटतं ना
असावं कुणीतरी आपलं
आपण म्हणजे समाज
आणि समाज म्हणजे आपण

फारच गुंता होतोय ना…
कसा सुटावा हा गुंता?
पण हा गुंता नाहीच
हीच तर जगण्याची रीत…

वाट

काय झाले या गावाला?
आकाश तापलेले
कुंद वातावरण
घराची बंद कवाडे
सुकलेले तुळशी वृंदावन
रिकामेच अंगण
सडाही न टाकलेले
रांगोळीची तर बात सोडा

सुन्न पाणवठा, नाही काकणांची किणकिण
समोर दिसते आहे झाड, वाळलेल्या काडीसम
गजबजाटही गायब, कुठे गेली छोटी मंडळी?
भिंतीला टेकून बडबडगीते म्हणणारी
आणि आजीच्या गोष्टी ऐकणारी
घरे होऊ लागली निर्मनुष्य

सोनियाच्या उंब-यावर आता
कुणी कुणाची वाट पाहत नाही
दाराआडून डोकावणा-या वहिनीसाहेब
डोईवर पदर घेतलेल्या, गेल्या कुठे?
काय झाले या गावाला?
नुसता ओस पडू लागला आहे…

घरटी गडी गावची वेस ओलांडून
चालत आहेत शहराची वाट
आटून गेलंय पाटाचं पाणी
आम्रतरूवर कुहू कुहू गाणारी कोकीळा
ती ही कुठे उडून गेली कुणास ठाऊक?
काय झाले या गावाला?
अरे! रे!
गाववाल्यांना आता सिटीच वाटू लागली आहे,
त्यांचे टुमदार व्हिलेज…





संपली एकदाची

तुला छोटीशी प्रतिभा मिळाली
त्याचे किती स्तोम माजवशील?
मान राहिला नाही आता
तुझ्या या प्रतिभेला

गर्दी करून ऐकणा-या श्रोत्याला
सर्दी झाली आहे तुझ्या प्रतिभेची
सगळीकडे विनोद केले जात आहेत
तुमच्या कविकुळावर

ज्यांनी केशवसुत, कुसुमाग्रज, विदांची
ह्रदयातून स्तुती केली
तेच निंदा करत आहेत तुमची
पण तू मात्र
निंदकाचे घर असावे शेजारी
यानुसारच वागतोस

तुझे मुक्तछंद ऐकवताना
श्रोत्यांचा किती रे अंत बघतोस?
तरी बरे की काहीजण
तुझ्या प्रतिभेला टाईमपास तरी म्हणतात
आणि टाळ्यांचा कडकडाटही करतात
संपली एकदाची म्हणून…

मानण्यात सुख

होतो हर्ष स्वप्नात पाहताना
जागेपणी नुसतास भास
समीरासम चोहीकडे रूप ठायी ठायी
अनुभवायचेच सारे, शब्दही न ओठी
स्पर्श नुसता कल्पिलेला
समाधान दुरून पाहून
जसा खिडकीतून पाऊस पहावा
अन् पावसात न भिजताही 
तन-मनात ओलावा हवा

असेच हे चालणार असेल तर
सवय करायलाच हवी
मानण्यात सुख हे मनाला
समजवायला हवे
दूरवर जाणा-या नावेस पाहून
हात हलवायलाच हवा
जेणेकरून नावेतल्या माणसाला
माझा कायमचा निरोप हा कळायला हवा…



तू इथेच कुठेतरी आसपास

प्राचीचा रंगसोहळा
किलबिल गीत सुमधूर
तुळशीपुढे दरवळला धूप
या क्षणी येतेय तुझी आठवण
हा दिवस आहे खूप खास
तू इथेच कुठेतरी आसपास

निलवर्णी नभाची शाल
भुईवरल्या हिरवळीला
रविकराची आस
तू इथेच कुठेतरी आसपास

हळूवार वा-याचा स्पर्श
मधूनच सुरंगीचा सुवास
तू इथेच कुठेतरी आसपास

रात्रीचा हिरमुसला मोगरा
दिव्याची मंद ज्योत
निद्रिस्त पलंगावर
तुझ्या स्वप्नांची रास
तू इथेच कुठेतरी आसपास

दिवस उगवतो कसाबसा सरतो
तुझ्या अस्तित्त्वाची जाणीव
क्षणोक्षणी होते
नाही…मनच तशी कल्पना करते
तू इथेच कुठेतरी आसपास…




बदल

पूर्वीच्या काळी
त्या छोट्याशा घरकुलात
विलक्षण शांती असायची
भरल्या गोकुळासारखे
घर असले तरी
जीवाला एकांत होता
नात्यांचा रेशमीबंध होता
आपुलकी, माया, प्रेम होते
सारे घर आनंदाने भरलेले असायचे
आणि…
आजच्या काळात
आपल्या माणसांशी
नुसते बोलायला थोडीशी सवड मिळाली तर
त्यातच गोड मानून घ्यावे लागते… 

या शब्दांनो या

या शब्दांनो या!
पिंगा घाला
माझियाभोवती
मनीच्या व्दारातून अलगद
खुली करा बंद कुपी
बोलक्या बाहुल्यांना
इथे दर्जा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा
मग कोण जाणेल,
अंतरंग मुक्या गोजिरीचे?
मनीच्या तळातून फुटतो टाहो
शब्दांची ताकद त्यास समजण्या,
सा-या भिंती भेदुनी या हो…

एकटे राहवेना

अनोळखी अबोल शांत
ह्रदयातील भावना
तरीही अशांत बोलकी
मनातील कामना

अनोळखी, अपरिचित
प्रेमाला काहीच मानवेना
जागी होई ह्रदयाच्या आत
नाजूक हळवी भावना
कुणाशी तरी नाते जुळावे
सतत अशी ओढ मना

बांधू पाहते रेशमीबंधन
ही दूरी मज साहवेना
रंगून जावे नवरंगात आपण
एकही क्षण आता
एकटे राहवेना…



बस एकदाच

दूर दूर …कुठेतरी
साद तुझी ऐकू येते आहे…
मनाला लागलेली ही चाहूल
असेल ना खरीखुरी?

एकच मनिषा
या वेड्या अबोलीची
सहवासाने तुझ्या
आयुष्य असे फुलून यावे
सात जन्माचे बंधन
तुझ्यासवे साजिरे व्हावे

या अनमोल नात्याची शपथ तुला
किती छळते हे एकाकीपण
एकदाच
बस एकदाच तरी तू
खराखुरा ये ना…



सारं काही आठवेल

वृक्षाने छाया देणे सोडले,
तर त्याची माया आटली,
असा समज झाला तुझा
लगेच आश्रमाची वाट दाखवून
मोकळाही झालास

पण तुझ्याही नशिबी
असेच दिवस येणार आहेत
तयार रहा

जेव्हा कॉम्प्यूटरसमोर बसलेलं
तुझं कार्टं
तुला माऊससारखं
खेळवून खेळवून
घराबाहेर काढेल तेव्हा
वृक्षाची छाया-माया
सारं काही आठवेल...

आमच्या गावचा पाऊस

ओल्या मातीला गंध देणारा
तडतड ताशा वाजवत
कडाडत्या विजेलाही संगे घेऊन येणारा
सारवल्या खळ्याचे तलाव करून टाकणारा
आमच्या गावचा पाऊस

झाडाझुडूपांना नाचायला लावणारा
रानफुलांना खदाखदा हसवणारा
आमच्या गावचा पाऊस

कष्टाळू कुळवाड्याला सुखावणारा
पिकांना गोंजारणारा
आमच्या गावचा पाऊस

दारात झिम्मा खेळणारा
पागोळ्यांतून छोट्या बाळूच्या हातात बागडणारा
आमच्या गावचा पाऊस

तिला, त्याला, सा-यांना हवाहवासा वाटणारा
उत्साह, चैतन्य नि जलवर्षाव करणारा
आमच्या गावचा पाऊस

मातीच्या घराला झोडप झोडप झोडपणारा
आणि कधी कधी रुसला तर
आत्महत्या करायला लावणारा
आमच्या गावचा पाऊस

          

सोन्यासारको सरावन

न्हिंबार नि पावस, सरावन इलो 
तरव्यावर पडलो तेवा, सोन्यासारको वाटलो


कदी न्हिंबार, कदी पावस
ह्यो खेळ सरावनात
नेमीच बघुक मेळता
पावस इलो इलो म्हंता म्हंता
पाटकन दडी मारता
मग भायर बघश्यात तर सोनाच सोना दिसता
तरव्याच्या लांबलचक टोकेरी पानावर
चमकत ह्रवता…


सरावन म्हयनो सनासुदीचो
फुगड्यांच्या तालाचो
माहेरवाशिनींच्या हिर्व्या आटवनींचो
मनात भरान ह्रवलल्या मॉप सोप्ना 
आनि नितळ उल्हासाचो


आनखीन काय सांगा तुमका,
कसो आसा ह्यो सरावनॽ
माज्या हळव्या मनाचो कोपरो भिजवता…
ह्यो ‘सोन्यासारको सरावन’