Sunday, 29 March 2015

चैत्र

चैत्र चाहुल
मनाला हुरहुर,
स्वप्नातून साकारणाऱ्या भविष्याची

चैत्राचं आगमन,
जीवनातील वसंतऋतूचं स्वागत
उभारून गुढी, आपल्याच कणखर हातांनी...

चैत्र मास
रंगीत, गंधीत कुसुमांचा उत्सव
मनाला दिलासा,
सुखाच्या पाऊलवाटेचा



चैत्राचा तरंग,
मन आशेच्या पालवीने लुब्ध

बागडतो फांदीवर स्वप्नांचा विहंग

चैत्र मोहरला,
चैत्र रंगला,
चैत्र गंधाळला,
चैत्र सजला,
चैत्र नटला,
चैत्र शहारलेला,
चैत्र नवचैतन्याने बहरलेला,
नयनी तृप्त साठवलेला...
चराचर सृष्टीचा हा 'चैत्र'सोहळा!!!!!


Saturday, 7 March 2015

प्रेरणा

घरच्या परिस्थितीला शरण जात
लग्नाला होकार दिलास
आपल्या स्वप्नांच्या फुलपाखरांना मुठीत बंद करून
सासरचं माप ओलांडलंस

तुझ्या भिरभिर नजरेला आणि बावरलेल्या मनाला
झालेल्या यातना तुझ्यापाशीच ठेवल्यास
थांगपत्ताही लागू दिला नाहीस कोणाला
हेच आपलं प्राक्तन
मोठ्या मनानं स्वीकारलंस
अजून सारं संपलं नाही,
आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यात,
मीच बदल घडवून आणेन
- असा विश्वास तुला कुठेतरी असावा...

याच विश्वासानं घरच नाही
तर अख्खं गावं आपलंसं केलंस
स्वतःचा संसार सावरलास
सोबत कित्येकींना जगण्याचं बळ दिलंस
आभाळासारख्या तुझ्या मनानं
कसं आणि कुठुन एवढं सामर्थ्य एकवटलं असेल?
फार कौतुक आणि अभिमान वाटतो तुझा

अखेर गावगुंडांनी त्यांचा डाव साधलाच
उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला
तुझा भरला संसार
त्यांच्याशीही तू खंबीरपणे लढलीस
तुझ्या विवेकबुद्धीनं तू त्यांनाही पुरून उरलीस
काही क्षण कोमेजलीस
काही क्षण अडखळलीस
काही क्षण निमूट बसलीस
काही क्षण शांत राहिलीस
काही क्षण असंबद्ध टाहो फोडलास
आणि पुन्हा सावरलस स्वतःला आणि आपल्या संसाराला
तुझ्या चेहऱ्यावर कधीही न लोपणारं हास्य
हीच त्यांची हार
अशी तू कणखर स्त्री
मला विविध रूपात भेटणारी...
तूच माझ्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत!!!!