Tuesday, 30 September 2014

कवी

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा
कवीचे हे आवडते शब्द

कवीला आपुलकी शब्दरत्नांची
तो शब्दांना बहाल करतो
सौंदर्याचा फुलोरा
त्यांच्याशी तो खेळतो, त्यांच्याशी भांडतो
त्यांना तो गुंफतो पुष्पमाळेपरी

प्रेमकवीच्या काव्याचा आवडता विषय
धुंद, हळूवार प्रीतीचे वर्णन करतो कवी
त्याचे प्रेमकाव्य मग
भुरळ घालते प्रेमी युगुलांना
आणि ओठांवर उमलते भावगीत

विश्वातील सा-या गोष्टींचा
कवीला जिव्हाळा
तो रखरखत्या उन्हालाही
सोन्यासारखे म्हणतो,
आणि उजाड, ओसाड जागीही
फुलवतो कुसुमांचा मळा



Wednesday, 24 September 2014

मन

मन म्हणजे काय असतं?
ह्रदयात लपलेली एक पोकळी
मन असतं उडतं पाखरू
भरारी घेत उंच आभाळात उडणारं

मन असतं गूढ अनाकलनीय
मनात असते आवडत्या व्यक्तींना जागा
तिथे नसते नावडत्या व्यक्तींना स्थान

मन असतं नाजूक कोमल
फुलाप्रमाणे सुगंधित
इतरांसाठी दरवळणारं

मनात असतात
असंख्य भावना, कल्पना आणि स्वप्ने
माणूस त्यांना साकारत
जीवन जगत असतो




Monday, 15 September 2014

रविकर माझा सखा

पाहिला तुझा पाठलाग
लपून छपून येण्याचा
मला सोनेरी स्पर्श करण्याचा
आणि भेटण्यासाठी
एवढे उतावीळ होण्याचा

काळ्या पांढ-या रेषांनी
भयानक होते रात्र
कुठेतरी उद्याचा कवडसा
डोकावत राहतो हळूच
त्याला स्वप्नांची केविलवाणी साथ

कधीतरी उजाडेल
याच उमेदीने जगतो माणूस
पहाटे तुला एकदा पाहिले
की जीव धन्य होतो
हात न जोडता
क्षणभर डोळे मिटून घेते,
नि शांत होते

तुझा तो पाठलाग
हवाहवासा वाटतो
तुझी चाललेली अडथळा शर्यत
मागे वळून पाहते

चालू दे तुझा पाठलाग असाच
तेवढीच कुणाची तरी सोबत...





माझे मागणे

कुणाचीच सोबत नको
नकोत कुणाचे आपुलकीचे सल्ले
नकोत विचार कुणाचे
चांगले म्हणून मांडलेले
भुलविणारे शब्द नकोत
उगीच वेडी माया नको
कुणाचीच प्रेमळ साथ नको
पुस्तकांनो! फक्त तुमच्याशिवाय…


मनाची गुंफण

कामावरून घरी जाताना
फांदीआडून डोकावणारा चंद्र पाहून
मन सुखावून जाते
सारा थकवा विसरून जाते
या वेळेस तू ही चंद्राकडे पाहत असशील का?
मनोविचारांचा पक्षी उडतो
क्षणात धरणी, क्षणात आकाश
मनाची गुंफण होते
दोघांच्याही नकळत…


Wednesday, 10 September 2014

मालवणच्या सागरतिरी…

तू न मी कितीक वेळा
पाहतो भव्यतेची कळा
त्या भव्यतेलाच पार करून
चाललो आहोत आपण
दूरवर त्या भव्यतेपलिकडे

आधार आहे बोटीचा
साथीला वा-याची गाणी
तरंगतो त्या भव्यतेवर
पाहत बगळ्यांची माळ

ते पहा! भव्यतेचे टोक
नारळबनाची सळसळ
मधुनच डोकावे एखादी केळ
विसावू जरा सारवल्या खळ्यात
नजर धावे
अबोली शेवंतीच्या बागेत
कौलारू घरांची गुंफण
संशय नच हे कोकण!

या भागाची मुशाफिरी
तू न मी अनुभवली
मालवणच्या सागरतिरी…




सागरतिरी सायंकाली

चल रे, सख्या!
जाऊ आपण फिराया सागरतिरी
त्या मंद-धुंद गोड सायंकाली
सामोरी समींद्रा शुभ्र दुधापरी
अशा वेळी साथ तुझी मज वाटे बरी
जाऊ मऊ मऊ वाळूत पाय रोवूनी
पाहू खग कसे उडती गगनातुनी
रविकराला लपताना पाहू किना-यावर बैसोनी
पाहू एकमेकांकडे अधुनी-मधुनी

समुद्रातिरीची ही जादूगिरी
जाऊ डुंबूनी प्रेमसागरी
तू न मी शिवाय अशा वेळी
कसलाही मनी विचार नसावा
माझा हात मात्र तुझ्या हाती असावा…

Monday, 8 September 2014

अन् जगण्याचा अर्थ गवसला

प्रवेश घेतला अकरावीसाठी
तेव्हा पहिल्यांदा पाहिलं
विल्सन महाविद्यालय
अन् जगण्याचा अर्थ गवसला

अभ्यासासोबत कलेचे ज्ञान मिळाले
आयुष्य माझे फुलून आले
अन् जगण्याचा अर्थ गवसला

बारावीच्या नाजूक वळणावर
काव्य मला इथे स्फुरले
अन् जगण्याचा अर्थ गवसला

इथे इंग्रजीचा असून पगडा
मराठीचा श्वास जाणवला
अन् जगण्याचा अर्थ गवसला

मालवणी चेडू असूनसुद्धा
सन्मान मिळाला इथे मला
अन् जगण्याचा अर्थ गवसला

जेव्हा जेव्हा मी या वास्तूत
प्रवेश करते
आनंदाने येतो ऊर भरून
इथे आहे स्वातंत्र्य विचारांचे
मखमली पंख स्वप्नांचे
आशेच्या शब्दांना सत्यात उतरवणारे
या महाविद्यालयात घेऊन प्रवेश
जोड विश्वासाची कल्पनेला मिळाली
अन् जगण्याचा अर्थ गवसला

आपलं हे प्रेम

मला माहीत नाही
काय आहे हे नातं
जे बांधून ठेवतंय आपल्याला
खूप छान, निखळ, नितळ वाटतंय

मला माहीत नाही
का मी तुझाच विचार करतेय
पण हे खरंय
कारण तू माझ्यासाठी
अनमोल आहेस

मला माहीत नाही
आपण का एकमेकांशी
अनोळखी म्हणून बोलतो
चेह-यावर दाखवतोय असे
जसे काही घडलेच नाही

पण आपण एकमेकांना
जे सांगू पाहतोय
ते अजून अबोलच आहे
ह्रदयातली ती भावना
दडपली जातेय
आतल्या आत

काय आहे ही भावना
दोघांनाही कळतंय
पण वळत नाही
आपलं हे प्रेम...