Sunday, 2 November 2014

तीन ओळी

झाडे साजरा करतात
सृजनाचा उत्सव
जपतात हिरवे ऋणानुबंध


चंद्रासोबत फुलणारी रात्र
डोळ्यात बावरी स्वप्नं देते
आणि मन सुखावून जाते...


एका सुंदरशा वळणावरती
मागे वळून पहावेसे वाटले
दिसला गुलमोहोराचा पिवळा सडा...


कितीतरी दिवसांनी आज
या शहरात चंद्र दिसला
वाटतंय सारं शहर शांत आहे...


प्राजक्ताचे बहरणे
पाहिले नाही कधी
गोष्ट तशी साधी-सुदी


पावसाच्या धारा,
कधी अंगणात
कधी अंतरात



आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहताना
आशेचा किरण घेऊन आलेली
आपली ओळख प्रत्येकाने जपायलाच हवी… 




श्रावण मासात ऊन-पावसाचा खेळ
तसा सुख-दु:खाचा मेळ
आपल्या आयुष्यात




भरले मेघमयुराला हर्ष
तिच्या जीवनपटाला
मिट्ट काळोखाचा स्पर्श




एक सुंदर स्वप्न आहे
फांदीआडून डोकावणाऱ्या चंद्रासारखं
मनाला सुखद गारवा देणारं...


चार ओळी

पावसात भिजलेल्या क्षणांची
सरींच्या रेशमी धाग्यात मोतीमाळ झाली
मनाला पुन्हा एकदा सावरताना,
चिंब भिजवून गेल्या आषाढसरी



असे स्वत: स्वत:च्या कोशात
हरवून नाही बसायचे
अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट
नेहमी लक्षात ठेवायचे...



खास करून 
पहिल्या पावसाच्या आठवणी 
खूप काही देऊन जातात
सुखाचे गाठोडे आपल्यासमोर खुले करतात



आसवे ओघळतात, आठवणी दाटतात
मनाला गावच्या वेशीवर नेऊन सोडतात,
तिथे दिसते आपले कौलारू घर,
टपटप पडणारी पावसाची सर


स्वप्नांच्या रानात,
मोहक फुलली पिवळी फुले,
आठवण तुमची येता
मन हिंदोळ्यावर डुले



माझीच दृष्ट लागेल,
चैतन्यमूर्ती पावसाला
मनी मोलाचे स्थान,
सख्या पावसाला

मनाला अलगद झोका दिला
क्षण चाहूल देऊन गेला
चिंब भिजाया आतुर
पाऊस पाहुणा आला


आज पुन्हा स्वप्नांचा पाठलाग करताना,
मन मोहरून आले
आता समोर दिसतोय रस्ता,
निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा


पावसात भिजू नकोस म्हणून,
तुला कसे सांगूॽ
कारण माझेच हात आहेत,
पागोळ्यांखाली


कधी कधी इतरांच्या सुखातच
आपलं सुख मानायचं असतं
एखाद्या पुष्पबागेपरी
प्रत्येक नातं जपायचं असतं


मनात फुलांची बाग बहरली
दृष्टीपुढे कल्पनेतले विश्व
पण तिथवर नेणारी पायवाट
असंख्य संघर्षांनी युक्त


पावसाच्या सरींत
भिजताना एकाकी
नुसत्या छत्रीची
सोबत आता नकोशी...



एका आत्ममग्न संध्येला
असेच विचार दाटून आले मनात
आज स्वप्नांचा अंधार असलेली माझी लेखणी
उद्या असेल सत्याचा उजेड...

पाच ओळी

वाटतं कधी कधी निघून जावे दूर रानात,
किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात बसावे लपून...
नाहीतर आभाळात उंच उडावे 
तर पक्षांनी म्हणावे,
तुझे कौतुक करावेअसे तू काहीच केले नाहीस...


उगवलेला सूर्यफुललेला ऋतू
उधाणलेला समुद्रघड्याळाचे काटे
काहीतरी सांगू पाहतात आपल्याला
तरीसुद्धा
कळतंय पण वळत नाही हीच गत

वाटते मलाहोऊनी फुलपाखरू
थोड्या कालावकाशात
स्वच्छंद जगावे
सर्वांना सुखी करावे
खूप बागडावे त्यांच्यासवे


मन आरपार सुखावते पावसाच्या येण्याने
खूप काही घडेल म्हणते पावसाच्या येण्याने
आठवणींत बुडू नकोस बाई पावसाच्या येण्याने
यावेळी सुरात गाशील पावसाच्या येण्याने
आयुष्य बहरेल पुन्हा पावसाच्या येण्याने

वाटते मला
होऊनी चांदणी
साथ करावी चंद्राला
शितलता त्याची पांघरून
बेधुंद व्हावे रात्रीला



मनात पिंगा घालणारे शब्द
अलगद उतरावे कागदावर
त्यांना कितीही झाकून ठेवले तरी
सुगंध पसरावा आसमंतात
मोगऱ्याच्या कळ्यांसारखा


निद्राराणीच्या स्वप्नमहाली
मोगऱ्याची कळी हरवून गेली
गालावरती दवबिंदू टपोरा पडता
ती खुदकन हसली,
जणु तिच्या गंधाने ही पहाट झाली...


तू इथे असल्याची हुलकावणी, देतोय प्रत्येक क्षण
डोळ्यांना सतत तूच समोर हवायस
मेंदीच्या रंगसुगंधाने तुझे नाव लिहावे
हाताच्या तळव्यावर
हीच आस सध्या तरी या मुहूर्तावर


मी शोधीत फिरते,
माझी स्वतःची अशी
स्वतंत्र पाऊलवाट
तू सोबत आहेस,
हे गृहित धरून