Thursday, 23 June 2016

सौंदर्यशास्त्र

कवीला विचारू नये,
तू कधी प्रेमात पडलास का?
त्याचं उत्तर त्याच्याकडे नसेल
तो फक्त किंचीत हसेल...
तुम्हाला जी प्रेमाची व्याख्या वाटते,
त्या चौकटीत
कवी, लेखकाला बसवू नका...
त्याचं आणि तुमचं प्रेमाचं जग
फार वेगळं आहे...
त्याने Negative लिहिलं;
तर त्याचा प्रेमभंग झालाय...
त्याने Positive लिहिलं;
तर तो प्रेमात पडलाय...
अशी विधानं करून,
स्वतःलाच फसवू नये...
‘अनुभवातून तो लिहितोय’
असं म्हणालात तर एक वेळ ठीक आहे
पण त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ
त्याच्या खाजगी आयुष्यात शोधू नका...
कितीतरी कवींच्या लेखनाची अवहेलना
याचमुळे झालीय...
‘फार वाईट वाटतं...’

एक साधा सरळ प्रश्न आहे,
अनुभवांचं मौलिक संचित
सगळ्यांकडेच असतं...
मग सर्वसामान्य माणसालासुध्दा
कवीसारखं (लेखकासारखं) लिहावसं का वाटत नाही?
उत्तर सोपं आहे...
त्या अनुभवाच्या मौलिक संचिताकडे पाहण्याचा
नवा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे...
ज्यामुळे त्याला सतत नवनिर्मितीची ओढ लागलेली असते
म्हणूनच कवीच्या प्रेमाची अनुभूती आणि असीम प्रेमाला
बंदिस्त करू नका...
त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ शोधताना
सतत ‘शिक्के’ मारत राहू नका
आणि ‘ism’ मध्ये तर अजिबात कोंडू नका...
‘कलाकृतीचा आस्वाद’ घेणं
जितकं साधं सोपं, तितकच कठीण...
त्यासाठी एकच गोष्ट करायला हवी
‘सौंदर्यशास्त्र’ नावाच्या शाळेत नावनोंदणी
मग बघा, कलावंत आणि लेखकांशी
तुमची कशी छान गट्टी जमेल...!!!!!

1 comment: